लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उदिष्ठाने सुरु करण्यात आलेले आचार्य कौशल्य विकास चाणक्य केंद्र युवकांच्या उज्वल भविष्याची पायाभरणी आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने या कौशल्य विकास उपक्रमातून मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आचार्य चाणक्य युवा कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित करण्यात आला. मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतही सुरु करण्यात आलेल्या २४ प्रशिक्षण केंद्राचा यामध्ये समावेश आहे. दुरदृष्य प्रणालीतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षणासाठी २४ केंद्र सुरु करणारी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही राज्यातील एकमेव ठरली आहे.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची सुरुवात ही खुप महत्वपूर्ण असून या योजनेत ३७ कोर्सेसचा अंतर्भाव करण्यात आला आहे. रोज दोन तास येवून विद्यार्थ्यांना या केंद्रातून प्रशिक्षण घ्यायचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. याउलट संस्थेच्या वतीने ६ हजार रुपयांचे मानधन प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आता औद्योगिक गुंतवणूक येत आहे. येणा-या उद्योजकांना मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. तुमच्या सारखे प्रशिक्षीत तरुण त्यांना मिळाले तर स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी मिळणार आहेत. शिर्डी येथील औद्योगिक वसाहती मध्ये डिफेंन्स क्लस्टरचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून, दोन हजार युवकांना यामध्ये रोजगार मिळेल असे सागून मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसीत भारत घडविण्यासाठी देशातील युवा शक्तीचे योगदान खुप मोलाचे ठरणार आहे. त्यामुळेच यापिढीच्या भविष्याच्या दृष्टीने ही कौशल्य विकास केंद्र दिशादर्शक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मिळावे यासाठी पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेल्या उपक्रमाचे देशाच्या धोरणात परिवर्तन झाले, ही मोठी उपलब्धी आहे. २५ वर्षांपुर्वी संस्थेच्या वतीने कौशल्य शिक्षणाची परिषद घेण्यात आली होती. याची आठवण करुन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या कौशल्य शिक्षणाचे महत्व आधोरेखित झाल्याचे मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात आवर्जुन सांगितले.



