पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-पारनेरचा विकास दहशतीमुळे खुंटला असून तालुका ठेकेदार, माफिया राज आणि गुंंडगिरीला बळी पडला आहे. पाणी आणायचे म्हणजे एमआयडीसीमध्ये ठेकेदारी करायची नव्हे असा टोला खा. निलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावत पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार, जातेगाव, पुणेवाडी, राळेगणसिद्धी सर्व प्रलंबित असलेल्या पाणी योजनांच्या सर्वेक्षणास मान्यता दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पारनेर तालुक्याच्या वतीने काल, सोमवारी कान्हूर पठार येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे जे स्वप्न होते. पश्चिम घाटावरून वाहणारे पाणी पूर्वच्या कृष्णा व गोदावरी खोऱ्यात सोडून सिंचन क्षमता वाढवणे ते स्वप्न पूर्ण करणार. पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प महायुतीचा आहे. पारनेच्या दुष्काळी भागांच्या सर्व योजना कार्यान्वीत करून पठार भागाला पाणी देणार असल्याचेही ते म्हणाले.
आ. काशिनाथ दाते म्हणाले की, उपसा सिंचन योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने या योजना रखडल्या गेल्या. या रखडलेल्या योजना कार्यान्वीत करून स्व. माजी खा. बाळासाहेब विखे यांचे स्वप्न असलेल्या पश्चिम घाटावरून वाहणारे पाणी पूर्वच्या कृष्णा गोदावरी खोऱ्यात सोडल्यास सिचन क्षमता वाढेल. आज या कल्पनेला मूर्त स्वरूप आले आहे.
मंत्री विखे पाटील यांच्यामार्फत जलसंपदा खाते आपल्या जिल्ह्याला मिळाले आहे. गोदावरी खोऱ्यातील पाणी अडवण्यासाठी शासनाने घातलेली बंद उठवावी. लाइनिंग दुरुस्त करून शेवटच्या टेल टँक पर्यत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
सुजित झावरे म्हणाले की, राज्यातील पहिली पाणी परिषद पठार भागावर होणे ही पठार भागाच्या दृष्टीने सोन्याचा दिवस आहे. याप्रसंगी आ. काशिनाथ दाते, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, भाजपा नेते विश्वनाथ कोरडे, माजी सभापती गणेश शेळके, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सचिन वराळ, वसंत चेडे, महिला आघाडीच्या सोनाली सालके, सुषमा रावडे, शंकर नगरे, पंकज कारखीले, सुनील थोरात, अरुण ठाणगे, विक्रम कळमकर, अर्जुन नवले, सुशीला ठुबे, पांडुरंग गायकवाड, सखाराम ठुबे, सुरेश पठारे, वसंत शिंदे, गोकुळ वाळूंज, अब्बास मुज्जावर, दिलीप दाते, दादाभाऊ सोनावळे, सुशांत ठुबे, कानिफनाथ ठुबे, रमेश भागवत, संदीप ठुबे, राजाराम एरंडे, सुभाष ठुबे, बी. एल. ठुबे, भाऊसाहेब खिलारी, संतोष वाडेकर, अशोक चेडे, दादाभाऊ सोनावळे, किसन धुमाळ उपस्थित होते.



