spot_img
spot_img

ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली परदेशींना यावर्षीचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार जाहीर

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-वारकरी संप्रदाय आणि संत सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल जळगाव जिल्‍ह्यातील चाळीसगाव येथील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली परदेशी यांना यावर्षीचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार जाहिर झाला आहे. सोमवार दि.१७ मार्च रोजी लोणी बुद्रूक येथे या पुरस्‍काराने त्‍यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पूरस्कार निवड समितीचे अध्यक्ष महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केली.

अहिल्‍यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सन २०१७ पासून हा पुरस्कार दिला जातो. लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार राज्यातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखालील भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील (भिवंडी) व प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे (नेवासा) ही त्रिसदसीय समिती पुरस्कार्थीची निवड करते.

यापूर्वी हभप पंढरीनाथ नाना तावरे (जालना), निष्काम कर्मयोगी हभप बाळकृष्ण महाराज भोंदे(अहिल्‍यानगर), हभप नामदेव महाराज शामगावकर (सातारा), स्वामी सागरानंद सरस्वती ( नाशिक ),शांतिब्रम्ह मारुतीबाबा कुर्हेकर (पुणे),हभप श्रावण बाबा कुंवरा(पालघर),पं. भीमसेन जोशी यांचे सहकारी माऊली बाबा टाकळकर(पुणे) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

२०२५ च्या पुरस्काराची घोषणा करताना महंत उद्धव महाराज म्हणाले की, या पुरस्कारासाठी अनेक नावे समितीच्या विचाराधीन होते.आगामी काळात त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यावर्षीसाठी आम्ही वारकरी संप्रदाय, संत विचार आणि साहित्य शहारापासून खेड्यापर्यंत आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवण्या बरोबरच वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा, देशी गायींचे संगोपन असे असामान्य कार्य गेली पाच दशके करीत असलेले बेलदारवाडी ता.चाळीसगाव जि. जळगाव येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख महामंडलेश्वर १००८ हभप ज्ञानेश्वर माऊली परदेशी (कुमावत) यांची निवड केली असल्‍याचे पुरस्‍कार समितीच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

जेष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली यांनी अनेक युवा कीर्तनकार घडवून वारकरी संप्रदायात नवी पिढी आणण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न केले आहेत. चातुर्मासात पंढरपूर येथे हजारो वारकऱ्यांची निवास आणि भोजन व्यवस्थेची होणारी गैरसोय त्यांनी दूर करून चार महिने मोफत अन्नछत्र सुरू केले.त्यांचे संपूर्ण जीवन आदर्श आणि प्रेरणादायी असून त्यांना हा पुरस्कार घोषित करताना आम्हाला मनस्वी आनंद आणि समाधान वाटत असल्‍याचे निवड समितीच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

मानपत्र,स्मृती चिन्ह आणि २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून सोमवार दि.१७ मार्च रोजी सकाळी ११ वा. संत तुकाराम महाराज मंदिर प्रांगण लोणी बुद्रुक येथे भव्य समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या समारंभाला राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, हभप भारत महाराज धावणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्धव महाराज मंडलिक यांनी दिली. पुरस्काराच्या घोषणे प्रसंगी हभप भारत महाराज धावणे,ट्रस्टचे अध्यक्ष देविदास म्हस्के, लोणीच्या सरपंच कल्पनाताई मैड, विखे पाटील ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, लोणी विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव धावणे, उपाध्यक्ष नानासाहेब म्हस्के, उपसरपंच गणेश विखे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!