spot_img
spot_img

श्रीरामपुरातील “आदर्श लॉज” एक वर्षासाठी सील व्यवस्थापकास अटक, फरार आरोपीचा शोध सुरू

श्रीरामपुर (जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील रंगोली रोड परिसरात असलेल्या “आदर्श लॉज” येथे सुरू असलेल्या अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत सदर लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश बजावले आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दि. ०४ सप्टेंबर २०२५ रोजी अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आदर्श लॉजचा व्यवस्थापक धीरज प्रमोद बिंगले (वय ३५, रा. रंगोली रोड, वार्ड क्र. ५, श्रीरामपुर) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बनावट ग्राहक व पंचांसह छापा टाकण्यात आला.

छाप्यात लॉजमधून तीन पीडित महिला आढळून आल्या. तपासात व्यवस्थापक धीरज बिंगले व त्याचा साथीदार अहमद शेख (रा. बाबरपुरी, वार्ड क्र. २, श्रीरामपुर – फरार) हे महिलांकडून वेश्या व्यवसाय करून ग्राहकांकडून पैसे घेऊन स्वतःकडे जमा करत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. ८२३/२०२५ अन्वये स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी चार आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून, आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून पुन्हा पुन्हा देहव्यवसायात ढकलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही १० जानेवारी २०२४ रोजी याच लॉजवर छापा टाकण्यात आला होता व त्यावेळीही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कोणतीही सुधारणा न झाल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली.

सदर लॉज हे श्रीराम मंदिर, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, गणपती मंदिर व नुराणी मस्जिद यांसारख्या धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ असून, परिसरात शाळा, कॉलेज व निवासी वस्ती असल्याने सामाजिक व सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होत होता.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम १८ अंतर्गत लॉजचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपुर यांनी खुलासा मागवून, आरोपींचा खुलासा असमाधानकारक असल्याचे नमूद करत दि. ०९ फेब्रुवारी रोजी आदर्श लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सदर लॉज पोलीस प्रशासनाकडून सीलबंद करण्यात आला आहे. यापुढेही ज्या ठिकाणी अनैतिक देहव्यवसाय सुरू असल्याचे व त्यात लॉज किंवा हॉटेल चालकांचा सहभाग आढळून येईल, त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या पथकाने केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!