श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- रांजणखोल (ता.राहाता) येथील सोसायटी परिसरात काळ्या रंगाच्या इनोव्हा कारजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तिघांपैकी एका तरुणाला तलवारीसह श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत सुमारे ५ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पथक टिळकनगर बिट हद्दीत गस्त घालत असताना रात्री सुमारे ९.२० वाजता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रांजनखोल गावातील सोसायटीजवळ काळ्या रंगाच्या इनोव्हा गाडीजवळ तीन इसम उभे असून त्यापैकी एकाच्या हातात तलवार आहे, तसेच गाडीच्या मागील सीटवर लोखंडी पाईप ठेवलेला आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री सुमारे ९.५० वाजता पोलिस पथक तेथे पोहोचले असता तीन इसम दिसून आले. पोलिसांना पाहताच त्यांपैकी दोघे अंधारात पळून गेले; मात्र तलवार हातात असलेल्या इसमाला पोलिसांनी पकडले.
आरोपीची ओळख पकडलेल्या तरुणाने आपले नाव सिद्धार्थ आण्णा पठारे (वय २८, रा. दत्तनगर, श्रीरामपूर) असे सांगितले. त्याने पळून गेलेल्या साथीदारांची नावे कृणाल इंगळे (रा. जवाहर वाडी) व भैय्या ढोकचौळे (रा. रांजनखोल) अशी असल्याची माहिती दिली.
जप्त मुद्देमाल पोलिसांनी पंचासमक्ष खालील मुद्देमाल जप्त केला –सुमारे १ हजार रुपये किंमतीची लोखंडी तलवार (पात्यावर “सिरोही की तलवार” अशी नोंद)५०० रुपये किंमतीचा लोखंडी पाईप५ लाख रुपये किंमतीची काळ्या रंगाची इनोव्हा कार (क्र. महिला ०४ एडीएम ७७७५)१५हजार रुपये किंमतीचा विवो y २९ मोबाईल३५ हजार रुपये किंमतीचा विवो V५०मोबाईल एकूण सुमारे ५ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल सदर आरोपीकडे कोणताही परवाना नसताना धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली दहशत कमी झाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.



