spot_img
spot_img

पोल उभारण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागितली लाच; महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर एसीबीची कारवाई

शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा):-नैसर्गिक आपत्तीत पडलेला वीजेचा पोल उभारण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करण्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले. बापुसाहेब ठकाजी वीरकर (वय ४०, वरिष्ठ तंत्रज्ञ, ढोरजळगाव सेक्शन, महावितरण, शेवगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

नांदूरविहिरे (ता. शेवगाव) येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदाराची गट क्रमांक २२२/१ मध्ये शेती असून, विहिरीतील पाण्याचा उपसा कृषीपंपाद्वारे केला जातो. या कृषीपंपासाठी त्यांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेतली आहे.

६ ऑक्टोबर रोजी तक्रारदारांनी शेतीपंपाची वीज बंद असल्याबाबत गावातील वायरमन बापुसाहेब वीरकर यांना फोन केला होता. त्यावेळी परिसरातील वीजेचा पोल पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगत, नवीन पोल उभारण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मिळून सहा हजार रुपये जमा करून द्यावेत, अशी मागणी वीरकर यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

यानंतर तक्रारदाराने ८ ऑक्टोबर रोजी एसीबीच्या अहिल्यानगर कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता, आरोपी वीरकर यांनी सहा शेतकऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये जमा करण्याची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत वीरकर यांना २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया के. देवरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गजानन गायकवाड, सचिन सुदुक, वैभव सुपेकर व चालक पोलीस हवालदार करांडे यांनी सहभाग घेतला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!