श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पाणीवाटपातील दुजाभावाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. उपनगराध्यक्ष सौ. कांचन सानप आणि मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्या उपस्थितीत ही सभा झाली.
पाणी वाटपावरून वाद आणि मध्यस्थी
सभेत विरोधी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांनी पालिका पाणी वाटपात दुजाभाव करत असल्याचा गंभीर आरोप केला. रेल्वे रुळाच्या पलीकडच्या वॉर्ड क्र. २ मध्ये दररोज पाणी दिले जाते, तर अलीकडील भागात मात्र पुरेसे पाणी पुरवले जात नाही, असा दावा छाजेड यांनी केला. त्यावर सत्ताधारी नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी तीव्र आक्षेप घेत विरोधकांवर निशाणा साधला. यावरून विरोधी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, संजय गांगड, सौ. स्नेहल खोरे आणि सौ. वैशाली चव्हाण यांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांमध्ये जोरदार चर्चेमुळे काही काळ तणाव वातावरण तयार झाले होते . शेवटी नगराध्यक्ष करण ससाणे यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.
नोव्हेंबरमध्ये पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्र्यांची भेट
सध्या पालिकेच्या साठवण तलावात केवळ ११ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने पुढील आवर्तन डिसेंबरमध्ये सोडणार असल्याचे कळवले आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालिकेने सध्या आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबरमध्येच पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेण्याचा निर्णय सभेत सर्वानुमते घेण्यात आला.
नवीन साठवण तलाव व ठेकेदारावर कारवाईची मागणी
सभेत नवीन साठवण तलावाच्या रडखडलेल्या कामावरही चर्चा झाली. ठेकेदाराकडून काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल नगरसेवक आकाश बेग यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली. यावर बोलताना नगराध्यक्ष ससाणे यांनी स्पष्ट केले की, ठेकेदारावर थेट कारवाई केल्यास काम बंद पडून प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होईल. केंद्र सरकारच्या योजनेतून होणाऱ्या या कामासाठी पालिकेचा १० टक्के हिस्सा भरण्यात आला असून मार्च २०२७ ची मुदत असली तरी काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
पाणीपट्टी कमी करण्यास मुख्याधिकाऱ्यांचा नकार
आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याने पाणीपट्टीत सूट देण्याची मागणी नगरसेविका स्नेहल खोरे यांनी लावून धरली. मात्र, पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चाच्या आधारेच ही पट्टी आकारली जात असल्याने ती कमी करणे शक्य नसल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी स्पष्ट केले. तसेच शहरात बंद पडलेले बोअरवेल शोधून ते तातडीने सुरू करावेत आणि पालिकेच्या बोअरवेलवर सुरक्षेसाठी कर्मचारी नियुक्त करावेत, अशी सूचना श्रीनिवास बिहाणी व आशिष धनवटे यांनी मांडली.




Total Users : 673548