spot_img
spot_img

मसाल्यांचा ६.४२ कोटींचा साठा जप्त; २७ परवाने निलंबित अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यात आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर(जनता आवाज वृत्तसेवा):-मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छत्रपती संभाजीनगर विभागात मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेत ६ कोटी ४२ लाख ७७ हजार रुपये किमतीचा २ हजार ५१७ क्विंटल मसाले व मसालेजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ अन्न व्यवसाय परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विभागातील उत्पादक, घाऊक विक्रेते, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या ९६ आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ४७ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाब लक्षात घेऊन भेसळयुक्त, अप्रमाणित आणि असुरक्षित मसाले बाजारात येऊ नयेत, यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा मानकांनुसार आवश्यक स्वच्छता न राखणाऱ्या आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

साठ्याची विक्री, वाहतूक करण्यास बंदी

जप्त केलेल्या मसाले साठ्याची विक्री, वाहतूक, हस्तांतरण, पुनर्पॅकिंग तसेच लेबल बदलण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय या साठ्याची विल्हेवाट लावता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मसाले व मसालेजन्य पदार्थांच्या तपासणीसाठी २३ ते २९ ऑक्टोबरदरम्यान राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात आली. राज्यात १ एप्रिलपासून आतापर्यंत १ हजार ५७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, सुमारे १९ कोटी ७० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

अन्न व्यावसायिकांनी कच्च्या मालाच्या खरेदीचा स्रोत, खरेदी-विक्रीचे अभिलेख तसेच साठ्याची नोंद ठेवावी. मसाले योग्य लेबलसह पॅकबंद स्वरूपातच विक्री करावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनीही सुटे व विनालेबल मसाले खरेदी करणे टाळावे. परवानाधारक विक्रेत्यांकडूनच मसाले खरेदी करून पॅकिंगवरील बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि वापराची मुदत तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!