श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर कंटेनर व स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांचा देवदर्शनाचा प्रवास हा अखेरचा ठरला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाल्याने श्रीरामपूर शहरावर मोठी शोककळा पसरली आहे. जखमी तिघांमध्ये लहान मुलांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रशांत रमेश चव्हाण (वय २४), संगीता अनिल चव्हाण (वय ४०), सिद्धार्थ सुनील चव्हाण (वय १६), ऐश्वर्या अशोक चव्हाण (वय २६) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सारिका अनिल चव्हाण (वय ३०), रुद्र अशोक चव्हाण (वय ०६) आणि ऋत्वी अशोक चव्हाण (वय ०३) अशी जखमींची नावे असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॉलनी येथे वास्तव्यास असलेले चव्हाण कुटुंबीय स्विफ्ट कार (एमएच ०३ एएफ ००५४)ने शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंडाळा गावाजवळ चालक ओव्हरटेक करत असताना अंदाज न आल्याने बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या कंटेनर (एचआर ६७ एफ ३००२)ला जोरदार धडक बसली.
अपघाताचा आवाज प्रचंड असल्याने परिसरातील दुकानदार व प्रवासी तत्काळ मदतीसाठी धावले. मात्र धडक इतकी भीषण होती की, कारमधील चारही जण जागीच ठार झाले. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचल्याने परिसर सुन्न झाला होता.
नागरिकांनी जखमींना तातडीने लोणी येथील तसेच कामगार रुग्णालयात दाखल केले. तथापि, उपचारापूर्वीच काही जणांचा मृत्यू झाला होता तर उर्वरित जखमींवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात कारचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली.
श्रीरामपूरकरांवर मोठी शोककळा
श्रीरामपूर येथील बसस्थानकासमोरील संतोषी वडापावचे मालक अशोक चव्हाण यांच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात एकाच घरातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण श्रीरामपूर शहरावर शोककळा पसरली आहे. यावेळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांकडून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.



