अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सन २०२६ च्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची सभा दि. २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर महापौर ज्योतीताई गाडे व उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत बजेटमधील विविध तरतुदींवर चर्चा करत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त गजेंद्र मुक्तेकर, उपायुक्त मेहेर लहारे, उपायुक्त तडवी, शहर अभियंता मनोज पारखे, नगररचनाकार यादव, अभियंता वैभव जोशी, श्रीकांत निंबाळकर, आदित्य बल्लाळ, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत महापौर व उपमहापौर यांनी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. महसूल वाढीवर विशेष भर देत आर्थिक शिस्त व नियोजनाची गरज अधोरेखित करण्यात आली.
शहरातील विविध विकासकामांसाठी CSR निधीचा प्रभावी वापर करण्यासाठी तज्ञ व्यक्तीची मानधनावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच शहरातील ओढे-नाल्यांच्या सुशोभीकरणासाठी CSR निधीतून प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहरातील प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये नागरिकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी, तसेच महापालिकेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती टीव्हीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना देण्यात आल्या. यामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होणार असल्याचे सांगण्यात आले.
महानगरपालिकेची गेल्या एक वर्षापासून पडून असलेली शववाहिका कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेची स्वतंत्र ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबतही चर्चा झाली.



