spot_img
spot_img

अशोक खरात प्रकरण:पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित; तिघांवर गुन्हा, दोघांना अटक

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :- भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या दरम्यान तपासातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले.

कोपरगाव येथील “BMW” या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दि. २५ मार्च २०२६ रोजी राहुल गंगाधर शिंदे (अनिल कोल्ड्रिंक्स, कोपरगाव) याने मोबाईल वरून पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास केला असता हे व्हिडिओ योगेश पंढरीनाथ आढाव (रा. कोपरगाव),  याने राहुल शिंदे यास पाठविल्याचे निष्पन्न झाले.

पुढील तपासात योगेश आढाव याला हे व्हिडिओ त्याचा मित्र संदिप गर्जे (रा. माजलगाव, जि. बीड),  याने पाठविल्याचे समोर आले.

याप्रकरणी आरोपी राहुल गंगाधर शिंदे,योगेश पंढरीनाथ आढाव, संदिप गर्जे या तिघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४७/२०२६ अन्वये बीएनएस कलम २९४(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपी राहुल गंगाधर शिंदे आणि योगेश पंढरीनाथ आढाव यांना अटक केली असून तिसरा आरोपी संदिप गर्जे याचा शोध सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून अनेक महिला पीडित असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून अत्यंत गोपनीयतेने तपास करण्यात येत आहे. पीडित महिलांची ओळख उघड होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

पोलिसांनी नागरिक, न्यूज चॅनल्स, सोशल मीडिया पेजेस, यूट्यूब चॅनल्स तसेच ऑनलाइन न्यूज पोर्टल्सना आवाहन केले आहे की, पीडित महिलांची ओळख उघड करणारे अथवा अश्लील व्हिडिओ कोणीही प्रसारित करू नयेत. कोणाकडे असे व्हिडिओ असल्यास ते तात्काळ डिलीट करावेत.

अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या व्यक्तींसह संबंधित ग्रुप अॅडमिनवरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!