spot_img
spot_img

श्रीराम झेंडा मिरवणुकीवर दगडफेक; तिघे जखमी  पोलिसांचा कडक बंदोबस्त, गुन्हा दाखल

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- रामनवमीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या श्रीराम झेंडा मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाल्याने श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी (दि. २६ मार्च २०२६) दुपारी गोंधवणी रोड परिसरात घडलेल्या या घटनेत तिघेजण जखमी झाले असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग सुभाष झिरंगे (वय ३४, रा. झिरंगे वस्ती, गोंधवणी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. रामनवमी निमित्त ऋषिकेश सोनवणे यांच्यावतीने महादेव मंदिर, गोंधवणी येथून पारंपरिक श्रीराम झेंडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

ही मिरवणूक दुपारी सुमारे १२.३० वाजता गोंधवणी येथून सुरू होऊन गोंधवणी रोडमार्गे दशमेश चौक, मौलाना आझाद चौक मार्गे साय्यद बाबा चौक येथे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचली. याच वेळी साय्यद बाबा चौक येथील दर्गा व मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या काही व्यक्तींनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

अचानक झालेल्या दगडफेकीमुळे मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत सुयोग झिरंगे यांच्या डोक्याला दगड लागून सूज आली, किरण राजेंद्र लबडे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली, तर यश राजेंद्र गोराणे यांच्या डाव्या डोळ्याखाली गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९०(१), १९१(१), १९१(२), १९२, ११०, ११८(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती शहरभर पसरताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात असल्याने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली.

दरम्यान, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी पोलीस ठाण्यात भेट देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या घटनेचा निषेध व्यक्त करत भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी सांगितले.

घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. धार्मिक संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!