अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज हे मानवतेची शिकवण देणारे महान संत होते. देशभरातील जैन समाजाचे ते श्रद्धास्थान आहेत. नगरची भूमी त्यांच्या वास्तव्याने, पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आचार्यश्रींचे संस्कार व शिकवण याचे तंतोतंत पालन जय आनंद महावीर युवक मंडळ करताना दिसून येते. दरवर्षी होणारा अन्नदानाचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. दरवर्षी मंडळाचे सदस्य आचार्यश्रींच्या स्मृतीत उत्स्फूर्त रक्तदान करतात हे सुद्धा अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन उद्योजक मोहनलाल मानधना यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 34 व्या पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने महाप्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसाद वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी मोहनलाल मानधना बोलत होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ग्राहक भांडारचे चेअरमन विक्रम फिरोदिया, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे आशाताई डागवाले, माजी महापौर भगवान फुलसोंंदर, मनोज लोंढे, सेक्रेटरी आनंद मुथा, उपाध्यक्ष कुंतीलाल राका, कार्याध्यक्ष सत्येन मुथा, अजित गांधी, चेतन गुगळे आदींसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया की, अन्नदान आतून मिळणारे पुण्य सर्वात मोठे पुण्य असते. जय आनंद महावीर युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीदिनी दरवर्षी अन्नदान करण्याचा उपक्रम राबवित आहेत. आचार्यश्रींची मानवतेची, सेवेची शिकवण मंडळ अतिशय चांगल्या पध्दतीने अंमलात आणत आहे.
प्रास्ताविकात शैलेश मुनोत यांनी सांगितले की, आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या शिकवणुकीप्रमाणे कार्य करणाऱ्या जय आनंद महावीर युवक मंडळाने आचार्यश्रींच्या स्मृतीदिनी अन्नदानाचा उपक्रम सुरू केला. दरवर्षी अनेकांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जातो. मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अन्नदान उपक्रम राबवताना विशेष आनंद होत आहे.
यावर्षीही सर्वांना बुंदी, पुरी भाजी, मसालेभात असा रूचकर मेन्यू देण्यात आला. याशिवाय शहरातील वंचित, अनाथ, अपंग मुलांच्या विविध संस्थांनाही भोजन पोहोच करण्यात आले. भोजनावेळी सर्वांसाठी टेबल खुर्च्यांची तसेच थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच उन्हाळा लक्षात घेवून कुलरचीही व्यवस्था केली. आचार्यश्रींच्या स्मृतीदिनी मंडळाकडून दरवर्षी अन्नदान केले जाते, यातून प्रत्येकाला आनंदाची अनुभूती येते. जय आनंदचा जयघोष, डाळरोटी खाओ, प्रभू के गुण गाओ अशी प्रार्थना करीत मंडळाच्या महाप्रसाद भोजनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी मनोज गुंदेचा यांनी आभार मानले.



