spot_img
spot_img

सामाजिक वादातून माजी सरपंचाची कार जाळली?आरोपी सीसीटीव्हीत कैद

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) :- तालुक्यातील जाफ्राबाद येथे माजी सरपंच तथा सरपंच पती संदीप भाऊसाहेब शेलार यांच्या घरासमोर उभी असलेली चारचाकी कार अज्ञात इसमाने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाफ्राबाद-निमगाव खैरी रोड परिसरातील शेतगट क्रमांक १०५ येथे संदीप शेलार यांनी घरासमोर उभी केलेली (दणत 500) कार (एमएच ४८ ए ५४२७) शुक्रवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास पेटवून देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने कारवर पेट्रोल टाकून आग लावल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या प्रकरणी संदीप शेलार यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी सामाजिक कामाच्या निमित्ताने अनिल दशरथ नांगळ यांना मदत केली होती. याच कारणावरून शुभम बाबासाहेब नांगळ (वय २५, रा. नागापूर एमआयडीसी, अहिल्यानगर) याने संतापातून हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, कार पेटवितानाचा प्रकार घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फूटेज ताब्यात घेतले आहे. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल परेश आगलावे पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे जाफ्राबाद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!