संभाजीनगर/लोणी(जनता आवाज वृत्तसेवा): –गेल्या चार वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या पतीला भेटीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव पोळ परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताची पत्नी आणि तिच्या मामावर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
मृताचे नाव जाबीर रफीक शेख (वय ३६, रा. लोणी बुद्रुक, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) असे आहे. जाबीर आणि शब्बो उर्फ शबाना जाबीर शेख (रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांचा विवाह सुमारे १५ वर्षांपूर्वी झाला होता. कौटुंबिक वादातून गेल्या चार वर्षांपासून दोघेही वेगळे राहत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, शबानाने चर्चा करण्याच्या निमित्ताने जाबीर यांना रांजणगाव पोळ येथील ‘वेलकम’ हॉटेलमध्ये बोलावले होते. सोमवारी (दि. २०) सकाळी जाबीर घरातून निघून हॉटेलमध्ये पोहोचले. काही वेळाने शबानाचा मामा कलीम मेहमूद पठाण (रा. सोनेसांगवी, ता. शेवगाव) हाही तेथे आल्याचे तपासात समोर आले आहे.
यानंतर हॉटेलच्या खोलीत जाबीर यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
जाबीर यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांचे काका सज्जाक तय्यब शेख (रा. लोणी खुर्द, ता. राहाता) यांनी सुरुवातीला नेवासा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान घटना शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपास तेथील पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
शिल्लेगाव पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या हालचालींची पडताळणी करत असून, पत्नी व तिच्या मामाचा शोध सुरू आहे. या हत्येने अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.



