spot_img
spot_img

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला वृद्धाचा बळी चिंचोली फाट्यावरील घटना; १० ते १५ जण जखमी

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात साहेबराव राघुजी वाघमारे (वय ७०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे १० ते १५ नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघमारे हे आपल्या घरासमोरील दुकानाजवळ झोपलेले असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या वाघमारे यांना तातडीने जीवनदायी ॲम्ब्युलन्सचे निखिल भोसले यांनी राहुरी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, त्याच कुत्र्याने परिसरातील इतर नागरिकांवरही हल्ला करत सुमारे १५ जणांना चावा घेतला. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिंचोली गावचे सरपंच सुरेश लाटे, स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित पथकाकडून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देत कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!