श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा): – खैरीनिमगाव – पुणतांबा मार्गावर भरधाव वेगात वाहतूक सुरू असताना गुरुवारी सायंकाळी खैरीनिमगाव परिसरातील हॉटेल गीतगंगा जवळ भीषण अपघात झाला.
या अपघातात पुणतांबा येथील गौरव अशोक बनकर (रा. बजरंग वाडी, पुणतांबा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव बनकर हा श्रीरामपूर शहरातील एका कापड दुकानात काम करत होता.सायंकाळी काम आटोपून तो श्रीरामपूरहून पुणतांब्याकडे आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती देताच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, श्रीरामपूर – खैरीनिमगाव – पुणतांबा हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा असून अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे चित्र असून वारंवार अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण व सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



