श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- तालुक्यातील वांगी परिसरात प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एकास ताब्यात घेतले, तर एक आरोपी फरार झाला आहे. या कारवाईत सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी (दि. ३०) वांगी (ता. श्रीरामपूर) येथील बिरोबा मंदिराजवळील प्रवरा नदीपात्रात छापा टाकला.
गोपनीय माहितीनुसार काही इसम टेम्पोमध्ये वाळू भरत असल्याचे समजताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. छापा टाकताच एक जण पळून गेला, तर गोविंद काळू पवार (वय २१, रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत संबंधित टेम्पो हा सनी लक्ष्मण बारसे (रा. कारेगाव) याचा असल्याचे निष्पन्न झाले असून तो सध्या फरार आहे.
कारवाईदरम्यान विनानंबर टाटा कंपनीचा टेम्पो (किंमत सुमारे ४ लाख रुपये) आणि अंदाजे २० हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



