spot_img
spot_img

‘गुटखा रॅकेट’वर एलसीबीची कारवाई! ७० लाखांचा मुद्देमाल जप्त संगमनेर मार्गे पुण्याकडे अवैध तंबाखू वाहतूक; तिघे जेरबंद, मुख्य सूत्रधार फरार

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ६९ लाख ७९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संगमनेर तालुका हद्दीत ही धडक कारवाई करण्यात आली असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संगमनेर परिसरात सापळा रचला.

हिवरगाव टोलनाक्यावर संशयित आयशर टेम्पो अडवून तपासणी केली असता, वाहनात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू साठा आढळून आला. वाहनातील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हा माल गुजरातमधील वापी येथून पुण्याकडे नेला जात असल्याची कबुली त्यांनी दिली.

जप्त मुद्देमालात समावेश :

प्रीमियम आरएमडी पानमसाला – ३१६० पुडे (₹२८.४४ लाख)

एम सेंटेड तंबाखू – ७६० पुडे (₹४.५६ लाख)

रजनीगंधा पानमसाला – ११६० पुडे (₹१२.०६ लाख)

तुलसी जाफरानी जर्दा – १०८० पुडे (₹२.४३ लाख)

आयशर टेम्पो (MH 43 BX 2779) – ₹२२ लाख

तीन मोबाईल – ₹३० हजार

एकूण जप्ती : ₹६९.७९ लाख

या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार निलेश ललवानी हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करीवर यामुळे मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!