राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ) :– तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे शेतातील पाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली असून, याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रामदास कहार (वय 46, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शेतातील पाणी शेजारील शेतात गेल्यामुळे 27 एप्रिल रोजी त्यांचा भाऊ शैलेश कहार याच्याशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद त्याच दिवशी मिटविण्यात आला होता.
मात्र, 28 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता, मुलगा समर्थ व ओम कहार हे लोंढे यांच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेले असता पुन्हा वाद निर्माण झाला. यावेळी दोघांमध्ये शिवीगाळ व दमदाटी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर घरी परतल्यावर ओम शैलेश कहार व शैलेश रामदास कहार हे घरासमोर आले. त्यावेळी त्यांच्याकडे लोखंडी कत्ती व काठी होती. वाद चिघळत असताना ओम कहार याने कत्तीने वार करण्याचा प्रयत्न केला, ज्यात गणेश कहार यांच्या कपाळावर जखम झाली.
तसेच शैलेश कहार याने काठीने तुषार कहार यांच्या डोक्यावर व हातावर मारहाण केली. पुढे ओम कहार याने विटेने तुषार यांच्या छातीवर प्रहार केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी ओम शैलेश कहार व शैलेश रामदास कहार (दोघेही रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 439/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 118 (1), 125 (a), 351 (2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीसांकडून सुरू आहे.



