अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यात झालेल्या चैनस्नॅचिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वेगाने छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोन्याचे दागिने, मोबाईल आणि मोटारसायकल असा तब्बल २ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नस्थळी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या घटनेमुळे विवाहसोहळ्यात एकच खळबळ उडाली होती.
घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होते. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, श्रीरामपूर येथील रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे हा साथीदारांसह चोरीतील सोन्याची वाटणी करण्यासाठी ममदापूर फाट्यावर येणार असल्याचे समजले.
यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे सागर सुरेश कांबळे (वय ३२, रा. रामनगर वॉर्ड नं. १, श्रीरामपूर) आणि बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय ३६, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) अशी सांगितली. अधिक चौकशीत त्यांनी साथीदार आतिक अयुब उर्फ आरिफ शेख आणि सनी विलास ढोकणे यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. हे दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे ११.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण २ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यात घेतलेल्या आरोपींसह मुद्देमाल पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच जिल्ह्यातील चैनस्नॅचिंग घटनांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२४१-२४१६१११ या क्रमांकावर किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



