अहिल्यानगर( जनताआवाज वृतसेवा): – ऐतिहासिक नेहरू मार्केटचे पुनर्जीवन होण्यासाठी आ.संग्राम जगताप यांनी चांगला पुढाकार घेतला आहे. शहराच्या विकासाकरिता सतत अविरतपणे आ.संग्राम जगताप प्रयत्नशील असतात. मूळ नगर शहरात ज्या जुन्या पाऊलखुणा आहेत त्या तशाच दिसत असून त्यातून शहराचं वैभव टिकून आहे. आत वेगाने शहर विकसित होत असताना जुन्या शहराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. शहरीकरण वाढले, लोकांच्या गरजा वाढल्यात, लोकांचे राहणीमान बदलले आहे. त्यामुळे त्याप्रमाणे सुविधा देणे आवश्यक आहे. शहराच्या सौदर्यात व विकासात भर घालणारे नवनवीन प्रकल्प आता उभे राहणार असून याद्वारे अद्ययावत सुविधा देण्यासाठी मी निधीची कमतरता पडू देणार नाही. आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांची कधी नव्हेतर चांगली टीम आता उभी राहिली आहे. त्यामुळे भविष्यात नव्या व जुन्या शहराचा कायापालट झाल्याशिवाय रहाणार नाही. यासाठी माझे पूर्ण सहकार्य राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या चितळे रोडवरील नेहरू मार्केट येथे भव्य व्यापारी संकुल व भाजी मार्केट विकासकामांचे भूमिपूजन, तसेच सावेडी बस स्थानकाच्या पुनर्बांधणी व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन व पत्रकार चौक ते डीएसपी चौक दरम्यान सेंट्रल लाईन एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी युतीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक व प्रशासकीय अधिकारी वटसंख्या उपस्थित होते.
प्रास्ताविकात आ.संग्राम जगताप म्हणाले, बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या नेहरू मार्केटच्या कामास आता प्रत्यक्षात सुरवात होत आहे. शहरात नव्या अद्ययावत अनेक इमारती उभ्या राहत आहेत. बुरूडगाव रोड वरील मनपाचे भोसले हॉस्पिटल आत पूर्णत्वास येत असून ही इमारत मोठ्या खाजगी हॉस्पिटलला लाजवेल अशी भव्य झाली आहे. नेहरू मार्केटची इमारतही अशीच भव्य व शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरणार आहे. या नव्या इमारतीला जुन्या नेहरू मार्केच्या इमारतीप्रमाणे लुक देण्यात येणार असून टॉवर व घड्याळही लावण्यात येणार आहे. पण हे घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नसून शहराच्या विकासाची वेळ दाखवणारे असणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुळेच शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध झाला होता.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी नेहरू मार्केटच्या कामाची सविस्तर माहिती देताना सांगितले, नेहरू मार्केटच्या नव्या भव्य चार मजली इमारतीमध्ये भाजी मार्केट तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. याठिकाणी ५३ भाजी विक्रेत्यांसाठी ओटे, प्रत्येक मजल्यावर १६ दुकाने तसेच स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी मनापा फंडातून ९.३४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश भागनगरे यांनी केले. यावेळी चोपडा माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक विकी जगताप, नगरसेविका अशा डागवाले, वैशाली ढोणे,, मयुरी जाधव, सुजाता पडोळे, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रिया जानवे, कालिंदी केसकर, सागर मुर्तुडकर, सुरज जाधव, माजी नगरसेवक विजय परदेशी, अरविंद शिंदे, निखिल वारे, दत्ता गाडळकर, संजय महेश लोंढे, गणेश कवडे आदींसह नागरिक उपस्थित होते.



