spot_img
spot_img

वरातीत घुसून तिघांवर जीवघेणा हल्ला; वराच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी गजाचा प्रहार

घारगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील शेंडेवाडी येथील सतेचीवाडीत लग्न समारंभानंतर सुरू असलेल्या वरातीत घुसून काही मद्यधुंद तरुणांनी नवरदेवाच्या वडिलांसह तिघांवर लोखंडी गज, दगड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मुख्य आरोपीसह १० ते १५ जणांविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी यमाजी पवार यांच्या मुलाचा विवाह २२ जून रोजी झाला होता. रात्री सुमारे ११.१५ वाजता घरासमोर वरात सुरू असताना नवरीचा चुलत भाऊ मनोहर नामदेव दुधवडे (रा. पारदरा, ता. पारनेर) हा १० ते १५ साथीदारांसह तेथे आला. पूर्वीच्या वादातून त्याने नवरदेवाच्या नातेवाइकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच या वादाचे रूप हाणामारीत झाले.

वाद सोडविण्यासाठी पुढे आलेले नवरदेवाचे वडील शिवाजी पवार तसेच त्यांची मुले योगेश आणि प्रदीप यांच्यावर आरोपींनी लोखंडी गज व काठ्यांनी हल्ला केला. मनोहर दुधवडे याने शिवाजी पवार यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले. योगेश व प्रदीप यांनाही मारहाण करण्यात आली.

हल्ल्यानंतर पोलिसांत तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी घारगाव पोलिसांनी मनोहर नामदेव दुधवडे व त्याच्या १० ते १५ साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आदिनाथ गांधले पुढील तपास करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!