spot_img
spot_img

लवांडे शाईफेक प्रकरणाला राजकीय रंग; थोरातांचा सरकारवर हल्लाबोल

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाला आता स्पष्टपणे राजकीय रंग चढला असून, या घटनेवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी गटात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या हल्ल्याला “भ्याड” संबोधत सरकारवर जोरदार टीका केली, तर अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी हभप संग्रामबापू भंडारे यांच्या कृतीचे समर्थन केल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे.

थोरात म्हणाले, “विकास लवांडे यांच्यावर झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून तो लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. मात्र लवांडे यांनी धाडसाने या प्रसंगाला सामोरे जात विचारांची बाजू मांडली, त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.”

संत परंपरा आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा उल्लेख करत त्यांनी, “विचारांशी मतभेद असतील तर प्रतिवाद करावा; पण हल्ले करून दहशत निर्माण करणे ही चुकीची पद्धत आहे,” असे स्पष्ट केले. प्रवीणदादा गायकवाड, हनुमंत पवार आणि आता विकास लवांडे यांच्यावर झालेल्या घटनांचा दाखला देत पुरोगामी विचार मांडणाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वारकरी संप्रदायाने याबाबत जागरूक भूमिका घेण्याची गरज असल्याचे सांगत थोरात यांनी सरकारवरही टीकेची झोड उठवली. “दुर्दैवाने सरकार अशा प्रवृत्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. हे महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणारे आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, संग्रामबापू भंडारे यांच्या कृतीचे आमदार संग्राम जगताप यांनी उघड समर्थन केल्याने या प्रकरणाला आणखी राजकीय वळण मिळाले असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!