श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):-जगातील युध्दजन्य परीस्थिती पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाचा सर्वानीच विचार करण्याची आवश्यकता आहे.उधळपट्टी करून विवाह समारंभ करण्यापेक्षा सामुहीक विवाह सोहळ्यांचे आयोजन झाले पाहीजे असे मत जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे प्रवरा नदी वरील सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीतून श्रीरामपूर ते राहुरी तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमीपुजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,केंंद्र आणि राज्य सरकार देशातील सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय करीत आहे.पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात राज्यातील महायुती सरकार सुध्दा विकासाभिमुख निर्णय करून काम करीत आहे.
नुकत्याच पश्चिम बंगाल आसाम आणि अन्य राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे विकासाचे आणि विचारांचे आहे.देशातील जनता विकासाच्या पाठीशी उभी राहाते आणि विचारांना साथ देते असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,देशाला अस्थिर करू पाहाणार्या शक्ती नेस्तनाबूत झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य दुष्काळमुक्त करताना भारनियमनाच्या संकटातून राज्याची सुटका करण्यासाठी काम सुरू आहे.गावोगावी सौरऊर्जा प्रकल्प उभे राहात आहेत.शेतकऱ्यांना सौर पंपाच्या माध्यमातून सहकार्य होत आहे.जिल्ह्यात आतापर्यत ३९हजार मंजूर झाले असून दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.राज्य सरकारने कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला असून,वीज बील माफ करण्याचा निर्णय घेतला.नैसर्गिक संकट तसेच विविध योजनांचा निधी शेतकऱ्यांना मिळत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील चर अतिक्रमण मुक्त करण्याचे काम सुरू झाले आहे.५३किलो मीटरचे काम पावसाळ्या पुर्वी पूर्ण होईल असे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,वळणगाव बंधारा कामासाठी तसेच मध्यमेश्वर बंधार्याचे बॅरेजेस मध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.



