जामखेड (जनता आवाज वृत्तसेवा):- जामखेड तालुक्यातील तरडगाव शिवारात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.दत्तोबा ढाळे यांच्या विहिरीमध्ये मायलेकाचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. शाळू शिवाजी चौरे (वय २२) आणि तिचा दीड वर्षाचा मुलगा विवांश शिवाजी चोरे अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंजारवाडी येथील बिभीषण तांदळे (वय ५९) यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी आणि नातू हे 10 मे पासून बेपत्ता होते.शोध सुरू असतानाच, आज (11 मे) सकाळी 11 वाजेच्या सुमारास तरडगाव येथील दत्तोबा ढाळे यांच्या विहिरीत दोघांचेही मृतदेह तरंगताना आढळून आले.घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व सहाय्यक फौजदार सय्यद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीबाहेर काढून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले,तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पोलीस तपास आणि संशयाचे गुड अद्यापही उमजले नाही. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.प्राथमिक अंदाजानुसार,मृत्यूची वेळ 10 मे च्या मध्यरात्री 1 ते 3 वाजेच्या दरम्यान असावी,असे नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद (क्र. 12/2026) करण्यात आली आहे.
ही घटना निव्वळ आत्महत्या आहे की यामागे काही घातपात झाला आहे?मायलेक वंजारवाडीतून तरडगाव येथील विहिरीपर्यंत कसे पोहोचले?या प्रकरणी तालुक्यातील नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार सय्यद करत असून, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि चौकशी सुरू आहे. पोस्टमार्टमच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



