श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून या रॅकेटचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक केली असून एकूण आरोपींची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. यामध्ये पाच डॉक्टरांचा समावेश आहे.
या प्रकरणात यापूर्वी तीन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांच्या नातेवाईकांसह एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीसाठी वापरण्यात येणारी दोन सोनोग्राफी मशीन जप्त केली होती. त्यातील एक मशीन नेवासा येथील आरोपी डॉक्टर भणगे यांच्याकडून, तर दुसरे मशीन अटक आरोपी रवींद्र ढगे याच्याकडून हस्तगत करण्यात आले होते.
या दोन्ही मशीनचा वापर बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून संबंधित मशीनची कुठेही अधिकृत नोंदणी नसल्याचेही उघड झाले आहे. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडे चौकशी केली असता ही मशीन पुण्यातील काही डॉक्टर आणि एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली.
त्यानुसार पोलिसांनी डॉ. आकाश सुभाष मलगुंडे, डॉ. नीलकंठ अशोक जाधव आणि नरेंद्र साहेबराव ठाकरे यांना ताब्यात घेतले. विशेष पोलीस पथके रवाना करून या तिघांना उशिरा रात्री लोणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. प्रतिबंधित सोनोग्राफी मशीन त्यांनी नेमकी कुठून मिळवली, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करत आहेत.



