अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुका पोलिस ठाण्यात ११ मे २०२६ रोजी तक्रारदाराच्या मामासह अन्य १५ नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे करत होते. तपासात मदत करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.
त्यानंतर विभागाने पडताळणी केली असता, पोलिस मुख्यालय परिसरात झालेल्या भेटीत संबंधित अधिकाऱ्याने तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा एसीबीने केला आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारण्यात आलेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक राजू आल्हाट यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. तर पोलिस निरीक्षक छाया देवरे या पुढील तपास करत आहेत. या संपूर्ण कारवाईस नाशिक परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.



