spot_img
spot_img

विधान परिषदेत ‘लंके कार्ड’; राष्ट्रवादीची चाल, तनपुरेंना प्रत्युत्तर की आघाडीत नवा पेच?

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीची उमेदवारी मिळवल्यानंतर राष्ट्रवादीने टाकलेली ही खेळी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी राणी लंके उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील समीकरणांना नवे वळण मिळाले असून, ही उमेदवारी तनपुरेंना दिलेले राजकीय प्रत्युत्तर मानली जात आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळीही तनपुरे यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीने ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा पक्षाने अनपेक्षित चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आघाडीत मतभेदांची शक्यता

राणी लंके यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानुसार करण ससाणे यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ससाणे यांच्यासह पर्याय म्हणून दीप चव्हाण यांनाही सोबत घेत तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे.

अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवल्याने आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उमेदवारी माघारीपर्यंत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

महायुतीतही अस्वस्थता

दुसरीकडे महायुतीतही सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्राजक्त तनपुरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

मात्र तनपुरे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमधील काही जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावरूनही या नाराजीचे पडसाद उमटत असल्याची चर्चा आहे.

जगताप समर्थकांची स्वतंत्र तयारी

या निवडणुकीत आणखी एक वेगळे समीकरण पुढे येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी समर्थकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्हा परिषद मतदारसंघातून दिवंगत अरुणकाका जगताप यांनी दोन वेळा विजय मिळविला होता. त्यामुळे या जागेवर जगताप कुटुंबाचा नैसर्गिक दावा असल्याचा युक्तिवाद समर्थकांकडून केला जात आहे.

कमी मतदारसंख्या, वाढलेली चुरस

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस असून ४ जूनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यामुळे त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित असल्याने यावेळी ७५ जिल्हा परिषद सदस्य आणि १४ पंचायत समिती सभापती असे एकूण ८९ मतदार कमी झाले आहेत. परिणामी या निवडणुकीतील मतदारसंख्या केवळ ४६१ इतकी राहिली आहे. कमी मतदारसंख्या, पक्षीय प्रतिष्ठा, आर्थिक आणि राजकीय समीकरणे यांमुळे अनेक वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून, पुढील काही दिवस जिल्ह्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!