spot_img
spot_img

समृद्धी महामार्गावर लूटमार करणारी आंतरजिल्हा टोळी चार दिवसांत जेरबंद; ९. २८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-  समृद्धी महामार्गावर वाहनचालकांना लक्ष्य करून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत पर्दाफाश करत सहा आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत सुमारे 9 लाख 28 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या टोळीने महामार्गावर सलग तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दरोड्यासारखी गंभीर गुन्हेगारी केल्याचे उघड झाले आहे.

या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूकदारांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून, पोलिसांच्या वेगवान तपास यंत्रणेचे कौतुक केले जात आहे.

फिर्यादी दत्ता बाबुराव राजुळे (रा. लांबोटा, ता. निलंगा, जि. लातूर) हे 27 मे 2026 रोजी दुपारी त्यांच्या ट्रकमधून डिझेल वाहतूक करत असताना, समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 529.9 जवळ 7 ते 8 अज्ञात आरोपींनी त्यांना अडवले.

लोखंडी रॉडने मारहाण करून आरोपींनी ट्रकमधील डिझेल व रोख रक्कम असा सुमारे 7,465 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. त्यानंतर काही वेळातच याच टोळीने आणखी एका वॅगनार कारला अडवून चालक व त्याच्या पत्नीला धमकावून 1 लाख 24 हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड लुटली.

यानंतर पुन्हा एका ट्रकवर हल्ला करत आरोपींनी 150 लिटर डिझेल व रोख रक्कम असा सुमारे 18,950 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपींनी सुमारे 1 लाख 50 हजार 415 रुपयांचा मुद्देमाल लुटून महामार्गावर दहशत निर्माण केली होती.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 310(2), 118(1), 351(1), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेची तातडीची हालचालकेली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकात पोउपनि महादेव गुट्टे तसेच विजय पवार, फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, रोहित येमुल, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांचा समावेश होता.

पथकाने घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादी व इतर साक्षीदारांकडून आरोपींचे वर्णन संकलित केले. तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.जालन्यातून पहिली अटक, पुढे संपूर्ण टोळीचा पर्दाफाश

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने 1 जून रोजी जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात छापा टाकून निखील बद्रीनारायण गोरे (वय 19) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर साथीदारांची माहिती दिली.

यानंतर 2 जून रोजी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातून उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये—

शिवनाथ शांताराम आव्हाड (24, रा. शिर्डी) ओम बालाजी खरात (19, जि. जालना/छत्रपती संभाजीनगर) राहुल साधाकिसन कोकाटे (23, जि. छ. संभाजीनगर) साईराज गणेश शहाणे (21, रा. साकुरी, राहाता) यांचा समावेश आहे.चौकशीत आरोपींनी समृद्धी महामार्गावर इतर तीन अनोळखी साथीदारांसह लूटमार केल्याची कबुली दिली आहे.

वाहनं, मोबाईल व रोकड जप्तअटक करण्यात आलेल्या आरोपींकडून व्हेरना व स्विफ्ट डिझायर कार, सहा मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 9 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे महामार्गावरील संघटित गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला असून, पुढील तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुढील तपास सुरू सर्व आरोपी व मुद्देमाल कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवान तपास पथकाच्या समन्वयातून पार पडली.

समृद्धी महामार्गासारख्या महत्त्वाच्या वाहतूक मार्गावर झालेल्या या गुन्ह्याचा अवघ्या चार दिवसांत छडा लावल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!