spot_img
spot_img

महिला वाहकाला बसमध्ये मारहाण; विनयभंगाचा गुन्हा दाखल…. तिसगाव येथील प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांनी चोप दिल्यानंतर युवक पसार

पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- शेवगाव आगाराच्या एका महिला बस वाहकाला तिसगाव(ता. पाथर्डी) येथे बसमध्येच मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिला वाहकाला मारहाण होत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी संबंधित युवकाला बसमधून खाली उतरवून चांगलाच चोप दिला. मात्र, या गोंधळानंतर संबंधित युवक तेथून पसार झाला.

या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.संबंधित महिला शेवगाव आगारात बस वाहक म्हणून कार्यरत आहेत. सोमवार (दि. १ जून) रोजी त्या शेवगाव ते अहिल्यानगर या मार्गावरील बसवर कर्तव्य बजावत होत्या. सायंकाळी तिसगाव बसस्थानकावर बस थांबली असताना काही प्रवासी उतरले व काही नवीन प्रवासी बसमध्ये चढले. त्यावेळी मागून वाहने येत असल्याने बसचा दरवाजा ओढताना एका प्रवाशाच्या बोटाला दरवाजा लागला. याचा राग आल्याने संबंधित प्रवासी शिवीगाळ करू लागला.महिला वाहकांनी त्यास जाब विचारला असता त्याने दमदाटी करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपीने महिला वाहकाच्या अंगाला हात लावून विनयभंग केला तसेच हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील सुमारे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून हरविल्याचेही सांगण्यात आले आहे.दरम्यान, आरोपीसोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनीही शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिला वाहकांच्या मदतीसाठी आलेल्या बस चालकासदेखील आरोपी व त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेदरम्यान एसटी बसमधील महिला वाहकाला मारहाण होत असल्याचे पाहून परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी संबंधित युवकाला बसमधून खाली ओढून चोप दिला. यामुळे तिसगाव बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांच्या तावडीतून सुटका करून घेत संबंधित युवक तेथून पसार झाला. संपूर्ण प्रकार काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक दत्तात्रय खेडकर, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबादास शिरसाठ, सचिव बाळासाहेब सोनटक्के, कष्टकरी जनसंघाचे सचिव सुभाष खेडकर, किरण दहिफळे, संदीप सुडके, सुनील कर्नावट आदी पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन पीडित महिला वाहकाला धीर दिला. तसेच आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे केली.दरम्यान, संबंधित महिला वाहकाने पोलीस प्रशासन तसेच राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. महिला कर्मचारी म्हणून आमच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. सार्वजनिक वाहतूक सेवेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी आरोपीला २४ तासांच्या आत अटक न झाल्यास सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!