spot_img
spot_img

निर्मळ पिंपरी लिंगनिदान रॅकेटचा आणखी एक धागा उलगडला १९वी अटक, पाचवे सोनोग्राफी मशीन जप्त

श्रीगोंदा (जनता आवाज वृत्तसेवा):- राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. तब्बल १९ आरोपींना अटक, सहा डॉक्टर गजाआड आणि पाच सोनोग्राफी मशिनांची जप्ती अशा टप्प्यावर पोहोचलेल्या या कारवाईत आता श्रीगोंदा तालुक्यातील मेडिकल चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी एक बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

लोणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे राज्यभर पसरलेल्या लिंगनिदानाच्या अवैध साखळीचे धक्कादायक पैलू उघड होत आहेत. सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भणगे, दोन एजंट आणि सहा कुटुंबीय अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर एकामागून एक धागेदोरे समोर येत गेले आणि तपासाचा व्याप अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचला.

तपासादरम्यान श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे आणि डॉक्टर शेख यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पुण्यातील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य पुरवठादारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढे वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याच्याकडून अवैध लिंगनिदानासाठी वापरले जाणारे मशीन जप्त करण्यात आले. या सर्व आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढत गेली.

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून निफाड येथील डॉक्टर कुणाल वलटे यांनीही बेकायदेशीररीत्या सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी वलटे यांच्यासह मेडिकल चालक सागर उन्हाळ यांनाही अटक केली.

दरम्यान, वैद्यकीय साहित्याचा घाऊक पुरवठादार नरेंद्र ठाकरे याच्या चौकशीतून आणखी एका संशयिताचे नाव समोर आले होते. त्यानुसार मागील दहा दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील जालिंदर रामदास बोरुडे याला आरडगाव परिसरातील शेतातील झोपडीतून ताब्यात घेण्यात आले.

अटक होण्याची शक्यता लक्षात आल्याने बोरुडे हा गेल्या दहा-बारा दिवसांपासून फरार होता. नगर तालुक्यातील हातवळण परिसरातील शेतात लपून बसलेल्या बोरुडेला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातील क्रेटा वाहनातून बेकायदेशीररीत्या खरेदी केलेले आणि गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीनही जप्त करण्यात आले.

या प्रकरणात आतापर्यंत १९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सहा डॉक्टर, तीन मेडिकल चालक आणि वैद्यकीय साहित्याचा एक मोठा पुरवठादार यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पाच सोनोग्राफी मशिनांसह चार चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे तसेच तपास पथकाने ही कारवाई केली. पोलीस कॉन्स्टेबल महादेव कोहक आणि संदीप राऊत यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपासाचा वाढता फास आतापर्यंत १९ आरोपी अटकेत सहा डॉक्टरांवर कारवाई पाच बेकायदेशीर सोनोग्राफी मशिन जप्त चार चारचाकी वाहने ताब्यातअनेक जिल्ह्यांपर्यंत पसरलेल्या रॅकेटचा उलगडा अवैध गर्भलिंग निदानाविरोधातील राज्यातील ही अलीकडच्या काळातील सर्वांत मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!