शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- शेवगाव शहरातील वरूर चौक परिसरात घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी फिर्यादी रंजना दिलीप जेठे या मिरसगाव येथील लग्न समारंभ आटोपून आपल्या मुलीकडे डोईफोडेवस्ती, शेवगाव येथे चारचाकी वाहनातून जात होत्या. वरूर चौक येथे वाहनाचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी वाहनाच्या खिडकीतून हात घालून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व राणीहार जबरीने हिसकावून नेला होता.
या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत असताना मुख्य आरोपी लखन विजय काळे (वय २३, रा. ग्रामीण रुग्णालय परिसर, शेवगाव) हा तारकपूर बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून लखन विजय काळे व त्याचा साथीदार कानिफनाथ अंबादास झिपरे (वय ३९, रा. कोळगाव, ता. शेवगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीतील सोन्याचा मुद्देमाल भारत महादेव दहिवाळकर (वय ५१, रा. शेवगाव) याच्याकडे दिल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींकडून ५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली. या मुद्देमालाची किंमत सुमारे ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
आणखी सात गुन्हे उघड
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता शेवगाव, पाथर्डी, नेवासा व सोनई पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरी व जबरी चोरीसह एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे आरोपींकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सदर आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने केली.



