अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसला १७ जून २०२६ रोजी पुणे रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. यावेळी पुणे रेल्वे यार्ड पुनर्बांधणीसह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विवेक कोल्हे तसेच मध्य रेल्वेच्या मुख्यालय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे येथे सुमारे ६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची माहिती देत भविष्यात आणखी २० अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील १३२ स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून पुणे–नाशिक रेल्वेमार्ग आणि वंदे भारत स्लीपर सेवेबाबतही त्यांनी माहिती दिली.
पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्यालय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार विवेक कोल्हे तसेच इतर लोकप्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून अहिल्यानगर, शिर्डी, राहाता, कोपरगाव आणि पुणे मार्गावरील हजारो प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.
दरम्यान, कार्यक्रमाच्या निमित्ताने सुदर्शन डुंगरवाल यांनी माननीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध रेल्वे विषयक मागण्या व सूचनांबाबत निवेदन सादर केले. यावेळी रेल्वेमंत्र्यांसोबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी सूचनांची दखल घेत संबंधित विषयांचा विचार करण्याचे आश्वासन दिले.
पुणे–शिर्डी दरम्यानची ही थेट रेल्वेसेवा सुरू झाल्याने भाविक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांची प्रवासाची सोय अधिक सुलभ होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



