श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- शेवगाव येथे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शिवसेना नेते सागर बेग यांनी श्रीरामपूर येथील कार्यालयात मुलीच्या वडिलांकडे धनादेश सुपूर्द केला.
शेवगाव येथे घडलेल्या या घटनेनंतर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध व्यक्त केला असून, संबंधित प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात सागर बेग यांनी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका व्यक्त केली.
यापूर्वी शेवगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात बोलताना बेग यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन जाहीर केलेली मदत प्रत्यक्षात प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना सागर बेग यांनी, अन्यायग्रस्त कुटुंबांना सामाजिक संघटनांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले. तसेच समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास राष्ट्रीय श्रीराम संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सामाजिक पाठबळाची गरज
पीडित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर केवळ सहानुभूती नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीचीही आवश्यकता असते. अशा कुटुंबांना आर्थिक व मानसिक आधार मिळावा, यासाठी समाजातील विविध संघटनांनी पुढाकार घ्यावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




Total Users : 604608