राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ) : – राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे घडलेल्या एका धक्कादायक आणि अभूतपूर्व घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हरवलेल्या मतिमंद व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा समज करून नातेवाईकांनी धार्मिक विधीनुसार त्याच्यावर दफनविधी केला. मात्र काही दिवसांनी संबंधित व्यक्ती जिवंत अवस्थेत परतल्याने संपूर्ण प्रकरण गूढ बनले असून आता कब्रस्तानात दफन करण्यात आलेला मृतदेह नेमका कुणाचा होता? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील रहिवासी शब्बीर जमादार मन्सूरी हा मतिमंद असल्याने तो २१ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला आणि परतलाच नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. मात्र अनेक दिवस शोध घेऊनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
शेवटी कुटुंबीयांनी २४ मे २०२६ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट रजिस्टर क्रमांक १०८/२०२६ अन्वये शब्बीर हरवल्याची अधिकृत नोंद केली. याच काळात संगमनेर तालुक्यातील जोर्वे परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संबंधित मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध माध्यमांतून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मृत व्यक्तीचे वर्णन आणि शब्बीरच्या शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये काही प्रमाणात साम्य असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी शब्बीरच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. २७ मे रोजी नातेवाईक संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी मृतदेह पाहून तो शब्बीरच असल्याचा दावा केला. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि त्याच रात्री सोनगाव येथील कब्रस्तानात धार्मिक परंपरेनुसार दफनविधी करण्यात आला.
मात्र काही दिवसांनी या संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. शब्बीर प्रत्यक्षात जिवंत असल्याची माहिती समोर आली. तो चालत-चालत अहिल्यानगरच्या पुढील भागात पोहोचला होता. तेथे एका शेतकऱ्याला तो संशयास्पद अवस्थेत दिसला. शेतकऱ्याने त्याची विचारपूस केली असता त्याने भूक लागल्याचे सांगितले. त्याला जेवण देऊन संवाद साधल्यानंतर त्याने स्वतःचे नाव शब्बीर जमादार मन्सूरी असल्याचे आणि आपण सोनगाव येथील रहिवासी असल्याचे सांगितले.
शेतकऱ्याला याबाबत संशय आल्याने त्याने शब्बीरचे छायाचित्र काढून विविध व्हॉट्सअॅप समूहांवर प्रसारित केले. काही वेळातच ही माहिती सोनगावपर्यंत पोहोचली. नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्याची ओळख निश्चित केली आणि त्यानंतर तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
संगमनेर, राहुरी आणि नगर पोलिसांच्या समन्वयातून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शब्बीरचे चुलत भाऊ आणि इतर नातेवाईक नगर येथे गेले व त्याला ताब्यात घेऊन सुखरूप घरी आणले.
मृत व्यक्तीचा पोलीसांकडून तपास सुरू
दरम्यान कब्रस्तानात दफन करण्यात आलेला मृतदेह नेमका कुणाचा? संबंधित अज्ञात मृत व्यक्तीची खरी ओळख पटवण्यासाठी पोलीस यंत्रणा तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मृतदेह ओळख प्रक्रियेत नेमकी कुठे चूक झाली, याचाही शोध घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात आश्चर्य, संभ्रम आणि चर्चांना उधाण आले असून प्रशासनासमोरही अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.



