spot_img
spot_img

नमस्कार मी नगराध्यक्ष करणसिंह घुले पाटील बोलतोय…

संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई आणि संत चांगदेव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नेवासाची भूमी… ही केवळ एक नगरी नाही, तर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. अशा या पवित्र भूमीची ओळख विकास, संस्कार आणि सामाजिक सलोखा यासाठी व्हावी, बदनामी आणि वादांसाठी नव्हे हीच माझी प्रामाणिक भूमिका आहे.”

सन्माननीय मान्यवर, सप्रेम नमस्कार.

मी करणसिंह घुले. गेल्या काही दिवसांपासून आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा विचार करत होतो. आज तो योग जुळून आला आहे.

मी दिनांक २ जानेवारी रोजी नगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्याविरोधात सातत्याने एकांगी आणि हेतुपुरस्सर वृत्तांकन केले जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. हा विषय केवळ माझ्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही; अशा प्रकारच्या वृत्तांकनामुळे नेवासा नगरपंचायतसारख्या प्रतिष्ठित संस्थेची आणि संपूर्ण नेवासा शहराची प्रतिमा वारंवार डागाळली जात आहे. ही बाब प्रत्येक नेवासेकरासाठी चिंतेची आहे.

माझ्याविषयी कोणाला वैयक्तिक मतभेद किंवा नाराजी असू शकते. त्यावर मी सार्वजनिक वाद घालणार नाही. माझ्यावर टीका झाली, तर ती ऐकण्याची आणि त्यातून सुधारणा करण्याची माझी तयारी कायम आहे. परंतु शहराच्या प्रतिष्ठेची किंमत मोजून कोणाच्याही वैयक्तिक अजेंड्याला खतपाणी घालणे मी कधीही स्वीकारणार नाही.

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत माझा कोणताही आक्षेप नाही. उलट अशा बातम्यांमुळे प्रशासनाला अधिक चांगले काम करण्याची संधी मिळते, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. म्हणूनच मी टीकेपासून कधीच पळालो नाही आणि पुढेही पळणार नाही. मात्र, वस्तुस्थितीपेक्षा वेगळे चित्र निर्माण करून एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लक्ष्य करणे, हा पत्रकारितेचा नव्हे तर समाजहितालाच धक्का देणारा प्रकार आहे.

गेल्या काही महिन्यांत विविध घटनांमध्ये माझे नाव हेतुपुरस्सर जोडण्याचा प्रयत्न झाल्याचे मी अनुभवले आहे. ज्या घटनांशी माझा प्रत्यक्ष संबंध नाही, त्यातही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. अशा परिस्थितीत मी कोणताही दबावाचा किंवा बेकायदेशीर मार्ग न स्वीकारता केवळ कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि मीही त्याच अधिकाराचा वापर केला आहे.

माझ्यावर “गळचेपी” केल्याचा आरोप केला जात आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, कार्यभार स्वीकारल्यापासून सातत्याने दबाव, अपप्रचार आणि वैयक्तिक टीकेचा सामना मलाच करावा लागत आहे. तरीही मी संयम सोडलेला नाही. कारण माझे ध्येय कोणाशी संघर्ष करणे नाही; माझे ध्येय नेवासा शहराचा विकास, नगरपंचायतीची प्रतिष्ठा आणि जनतेचा विश्वास जपणे आहे.

मला राजकारण करायचे असते, तर निवडणुकीच्या काळात माझ्याकडे आलेल्या काही तक्रारींच्या आधारे मीही संबंधित यंत्रणांकडे दाद मागितली असती. काही मान्यवरांनी एकतर्फी वृत्तांकनाबाबत माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या आणि निवडणूक विभागाकडे जाण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर मी त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या. कारण माझा विश्वास सूडाच्या राजकारणावर नाही, तर विकासाच्या कामावर आहे. मला वाद वाढवायचे नाहीत; मला नेवासा घडवायचा आहे.

आजही अशा तक्रारी घेऊन अनेकजण माझ्याकडे येतात. पण मला त्या मार्गाने जायचे नाही. मला नेवाशाचा विकासातील अनुषेष भरून काढायचा आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. उलट आमच्या चुका निर्भीडपणे दाखवून देणारी माणसे मला हवी आहेत. कारण हुजरेगिरीमुळे विकास होत नाही; प्रामाणिक टीकेमुळे सुधारणा होते.

माझी एकच विनंती आहे चुका जरूर दाखवा, प्रशासनाला जाब जरूर विचारा; पण त्यासाठी आपल्या नेवासा शहराची बदनामी होणार नाही, याचीही काळजी घ्या. संतांच्या विचारांनी जगाला दिशा दिलेल्या या भूमीची ओळख वादांनी नव्हे, तर विकासाने व्हावी, हीच आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

आज मी नेवासेकरांना एकच प्रश्न विचारू इच्छितो आपल्याला विकासाचे राजकारण हवे आहे की बदनामीचे? सत्य, काम आणि पारदर्शकतेच्या बाजूने उभे राहायचे की अफवा आणि दिशाभूल यांना बळ द्यायचे? निर्णय तुमच्या हातात आहे.

मी कोणाविरुद्ध वैयक्तिक लढाई लढत नाही. मी फक्त नेवासा शहराच्या सन्मानासाठी, नगरपंचायतीच्या प्रतिष्ठेसाठी आणि सत्याच्या बाजूने ठामपणे उभा आहे. तुमचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. तो विश्वास कायम राखण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि निःस्वार्थपणे काम करत राहीन.

आपला विश्वासू

करणसिंह घुले पाटील (नगराध्यक्ष)

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!