spot_img
spot_img

पद्मश्रींनी पाहिलेलं स्वप्न साकार होतंय – सौ. शालिनीताई विखे पाटील  प्रवरा सांस्कृतिक महोत्सवामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):-पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पाहिलेले स्वप्न प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून साकार होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही बाबतीत शहरी विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असून, हा महोत्सव त्यासाठी महत्त्वाची संधी उपलब्ध करून देत आहे,” असे प्रतिपादन सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या संकल्पनेतून आणि  डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२६ अंतर्गत कोल्हार येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील उपस्थित होत्या.

यंदाच्या महोत्सवासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास’ ही संकल्पना घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र व कार्याची ओळख व्हावी, हा त्यामागील प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांचे कौतुक करताना शालिनीताई विखे पाटील यांनी शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून साकारलेले सादरीकरण हा उत्तम कलाविष्कार असल्याचे नमूद केले.

प्रवरा संस्थेने कोणताही भेदभाव न करता परिसरातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन व मदतीचा हात दिला आहे. पुणे-मुंबईतील नामवंत कलावंतांच्या तोडीस तोड कार्यक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थी सादर करीत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली असून, ग्रामीण विद्यार्थ्यांमध्येही मोठी कलात्मक क्षमता असल्याचे या कार्यक्रमातून सिद्ध होत आहे, असे त्यांनी सांगितले.

“आपल्याला केवळ नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे विद्यार्थी घडवायचे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करण्याची क्षमता असून, शिक्षकांच्या मार्गदर्शनातून त्यांना योग्य संधी मिळत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सांघिक भावना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते,” असेही शालिनीताई विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

पूर्वी पुणे-मुंबई येथील नाटके कोल्हार परिसरात सादर केली जात असत. त्यामुळे स्थानिक कलाकार व विद्यार्थ्यांना अपेक्षित वाव मिळत नव्हता. मात्र, आता विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने पद्मश्री विखे पाटील यांनी अपेक्षित केलेले ग्रामीण विद्यार्थी केंद्रित शिक्षण या उपक्रमातून प्रत्यक्षात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यंदाच्या महोत्सवात ४८७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, तर परिसरातील १५ शाळांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली. प्रवरेत शिक्षण घेऊन विविध उच्च पदांवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच या विद्यार्थ्यांनाही पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दरम्यान, ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यांश सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विशेष कौतुक केले.

विजेत्या शाळांचा गौरव

सर्व कार्यक्रमांचे परीक्षण प्रा. भाऊसाहेब नवले आणि प्रा. सूर्यवंशी यांनी केले. सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते विजेत्या शाळांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

माध्यमिक विभाग :

प्रथम क्रमांक – प्रवरा हायस्कूल, कोल्हार (CBSE)

द्वितीय क्रमांक – प्रवरा विद्यानिकेतन, फत्याबाद

तृतीय क्रमांक – प्रवरा माध्यमिक विद्यालय, गुहा

प्राथमिक विभाग :

प्रथम क्रमांक – नंदनवन पब्लिक स्कूल

प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून प्रवरा परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना प्रेक्षकांसमोर सादरीकरणाची संधी मिळावी आणि त्यातून रसिकांचे प्रबोधन व मनोरंजन व्हावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस आहेर, कु. साईशा तुपे, जबीन सय्यद, धीमते मॅडम आणि काजल यांनी केले. आभार प्राचार्य सुधीर मोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर आणि संभाजी देवकर यांच्या हस्ते नारळ वाढवून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी पत्रकार सुहास वैद्य,संजय कोळसे,यमन पुलाटे, गणेश सोमवंशी यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!