लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहाता तालुक्यातील ममदापुर येथे सोशल मीडियावरील एका व्हिडिओवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. मोबाईल दुकानात घुसून चाकूहल्ला, तोडफोड व मारहाण केल्याप्रकरणी सात जणांसह पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध लोणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महमद इसरार इलियास देशमुख (रा. ममदापुर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील मिरमुकी परिसरात नमाज पठणानंतर एका व्हिडिओवरून वाद झाला होता. या वादातून आरोपींनी प्रथम फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादीचे भाऊ इद्रीस इलियास देशमुख यांच्या मुस्कान मोबाईल शॉपीमध्ये लाकडी दांडके, हॉकी स्टिक व चाकू घेऊन घुसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आरोपींनी दुकानातील काचा फोडून मोबाईल व इतर साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर इद्रीस देशमुख यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याचवेळी शेजारील ओम गुरुदेव टी हाऊसमध्ये घुसून ओंकार सुखदेव नारळे व त्यांच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली. दुकानातील साहित्याचीही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मोईन मुस्ताकअली पटेल, मतीन मुस्ताकअली पटेल, शौकत हैयातअली पटेल, मुजाईद शौकतअली पटेल, महारूफ मोईनअली पटेल, प्रदीप बाळासाहेब कदम, राजेंद्र राऊसाहेब पारखे तसेच अन्य पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत.



