राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या पुढील अनुदानाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सात्रळ ग्रामपंचायतीतील कंत्राटी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी आणि कंत्राटी अभियंत्यालाही आरोपी करण्यात आले असून, तिघांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, सात्रळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हैदर याकुब पटेल (५६), कंत्राटी लिपिक ज्ञानदेव मोहन डुकरे (४३) आणि कंत्राटी अभियंता सचिन हौशीराम ब्राम्हणे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ व १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदाराला सन २०२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पहिला १५ हजार रुपयांचा आणि दुसरा ७० हजार रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित अनुदानाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामविकास अधिकारी पटेल व कंत्राटी लिपिक डुकरे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी रचलेल्या सापळ्यात कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या व्यवहारासाठी कंत्राटी अभियंता सचिन ब्राम्हणे यांनी डुकरे यास प्रोत्साहन दिल्याचा आरोपही एसीबीने केला आहे.
पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट व पथकाने सापळा यशस्वी केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.
दरम्यान, शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.



