spot_img
spot_img

निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीप्रकरणी ‘कृषी गौरव फर्टिलायझर्स’वर कृषी विभागाची कारवाई

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-  निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीप्रकरणी मे. कृषी गौरव फर्टिलायझर्स, घोडेगाव (ता. नेवासा) या आस्थापनेवर कृषी विभागाने कारवाई करून २१ लाख ८० हजार ४८६ रुपये किमतीचा २ हजार ३४ गोण्यांचा बेकायदेशीर खतसाठा जप्त केला आहे. तसेच, संबंधित आस्थापनेचा खत विक्री परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला असून, मालक किरण चंद्रकांत दौंडकर यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली.

कृषी विभागाच्या पथकाने १५ जून २०२६ रोजी मे. कृषी गौरव फर्टिलायझर्स, प्लॉट क्र. बी-५६, एमआयडीसी, शिंगवे तुकाई येथील आस्थापनेची तपासणी केली असता खत विक्री व साठवणुकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे तसेच नोंदवह्या उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान विविध कंपन्यांच्या नावांचा वापर करून बेकायदेशीररीत्या उत्पादित करण्यात आलेल्या रासायनिक खतांच्या २ हजार ३४ गोण्या जप्त करण्यात आल्या.

जप्त केलेल्या खतांचे नमुने पुणे येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. नियमानुसार तपासणी अहवालासाठी ३० दिवसांचा कालावधी उपलब्ध असतानाही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कृषी विभागाने अवघ्या १० दिवसांत प्रयोगशाळा तपासणी पूर्ण करून अहवाल प्राप्त केला. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार संबंधित खतांचे नमुने पीएच, सेंद्रिय कर्ब आणि कार्बन-नायट्रोजन (सी/एन) गुणोत्तर या विहित मानकांनुसार अयोग्य आढळले असून, संबंधित खते निकृष्ट दर्जाची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

निकृष्ट दर्जाची अथवा बेकायदेशीर खते विकणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाकडून यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असून, अशा प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!