अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्ह्यात वाढत्या बालविवाहाच्या घटनांदरम्यान आणखी एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. स्नेहालय संचालित उडान प्रकल्प, चाईल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून अवघ्या 14 वर्षीय मुलीचा बालविवाह ऐनवेळी रोखण्यात आला. विशेष म्हणजे विवाहस्थळी मंगलाष्टका सुरू असतानाच संबंधित यंत्रणांनी हस्तक्षेप करून ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांना हेल्पलाईनवर एका जागरूक नागरिकाकडून माहिती मिळाली की एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार आहे. माहितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या सीमा जुनी यांच्याकडे पुढील हस्तक्षेपाची जबाबदारी सोपवली.
यानंतर तात्काळ 1098 चाईल्ड हेल्पलाईन, 112 पोलीस आपत्कालीन सेवा, संबंधित गावाचे ग्रामसेवक तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी आम्ही विवाह करत नव्हतो, केवळ साखरपुडा करत होतो, असा दावा केला. मात्र मुलीचे वय, प्राप्त झालेली माहिती आणि विवाहासाठी सुरू असलेली तयारी लक्षात घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली.
पोलीस प्रशासन, ग्रामसेवक आणि उडान प्रकल्पाच्या प्रतिनिधींनी कुटुंबीयांना बालविवाहाचे कायदेशीर परिणाम तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यानंतर संबंधित कुटुंबाने सहकार्याची भूमिका घेत अखेर विवाह थांबविण्यास संमती दर्शवली.
या प्रकरणात संबंधित कुटुंबाचे जबाब नोंदवण्यात आले असून आवश्यक पंचनामा करण्यात आला आहे. तसेच पुढील समुपदेशन आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित कुटुंबाला 1 जुलै रोजी बालकल्याण समिती, अहिल्यानगर यांच्यासमोर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उडान प्रकल्पाच्या वतीने या प्रकरणाचा पुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाणार असून मुलीचे संरक्षण, शिक्षण आणि तिच्या कायदेशीर हक्कांच्या रक्षणासाठी संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.



