शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा) :-अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील साई जतिन दूध संकलन केंद्राचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न) अ. अ. भोईटे यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ९ जुलै रोजी संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी केली. तपासणीदरम्यान संकलित दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच आस्थापनातील त्रुटी आणि नाकारलेल्या अन्नपदार्थांबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालाचीही पडताळणी करण्यात आली.
तपासणीत आढळलेल्या बाबींच्या आधारे संबंधित केंद्राचा व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदीनुसार केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला.
राज्यात नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न भेसळविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्नपदार्थांमध्ये भेसळीचा संशय आल्यास किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी केले आहे.



