spot_img
spot_img

शिर्डी शहर हादरले! जीवघेण्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी, फळविक्रेत्या महिलेचा आज उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-काल शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरामध्ये एका धक्कादायक आणि खळबळजनक घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. साई मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रविवारी रात्री झालेल्या एका जीवघेण्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फळविक्रेत्या महिलेचा आज सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गजबजलेल्या आणि अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या मंदिर परिसरात घडलेल्या या हत्येच्या सत्रामुळे संपूर्ण शिर्डी शहर हादरले असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर हा संपूर्ण प्रकार घडला. या परिसरात जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय ३०) या महिला गेल्या अनेक वर्षांपासून फळे विकण्याचा व्यवसाय करत होत्या. याच परिसरात स्टीकर विकणाऱ्या दोन तरुणींसोबत त्यांचा रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास व्यवसाय करण्याच्या जागेवरून वाद झाला. हा किरकोळ वाद काही वेळातच अत्यंत विकोपाला गेला. रागाच्या भरात या दोन्ही तरुणींनी आपल्यासमोरील जयश्री यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यामुळे मंदिर परिसरात एकच पळापळ आणि खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भरगर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या गुन्ह्याची दखल घेत शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही संशयित तरुणींना ताब्यात घेतले आहे. जयश्री यांच्या मृत्यूनंतर शिर्डी पोलिसांनी दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साई मंदिर परिसरात अशा प्रकारे हत्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिर्डी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!