spot_img
spot_img

एसआयआरचा परिणाम; ग्रामपंचायत निवडणुकांना ब्रेक अहिल्यानगरातील ७५४ ग्रामपंचायतींसाठी नव्या मतदार यादीची शक्यता; निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याचे संकेत

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेवर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली असून, एसआयआरनंतर तयार होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय अद्ययावत मतदार यादीच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी वापरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे ७५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्या मतदार यादीवर होणार, असे चित्र आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एसआयआर मोहीम पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी वापरण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यानुसार आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम सध्या स्थगित ठेवला आहे.

या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरित तसेच बोगस मतदारांची नावे वगळून अधिक अचूक मतदार यादी तयार होणार आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात मुदत संपलेल्या तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत संपणाऱ्या ७५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून, यंदाही सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार आहे. सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडतही पार पडली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती. मात्र, एसआयआर मोहिमेमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी एसआयआर सुरू असताना स्वतंत्र मतदार यादी प्रसिद्ध करण्याऐवजी पुनरीक्षणानंतरची यादी वापरण्याची भूमिका आयोगासमोर मांडली होती. त्यानुसार आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास स्थगिती दिली.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका?

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १७ ऑगस्ट रोजी प्रारूप, तर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम विधानसभा मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर हीच अद्ययावत यादी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी वापरली जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!