spot_img
spot_img

पत्रकार पुरस्कार निवडीवर संशयाची सावली; पारदर्शकतेसाठी सोहळा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्याची मागणी

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- ज्येष्ठ संपादक वसंतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीरामपूर नगरपालिकेतर्फे पुन्हा सुरू करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कारावर वादाचे सावट गडद झाले आहे. पुरस्कार सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत होत असले, तरी पुरस्कारार्थी निवडीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पत्रकार क्षेत्रातून जोर धरू लागली आहे.

वसंतराव देशमुख हे निर्भीड, जनहितवादी आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी निवड करताना स्पष्ट निकष, अनुभवी संपादकांचा सहभाग आणि पत्रकारितेतील ठोस योगदानाचा विचार अपेक्षित होता. मात्र यंदा निवड समितीची रचना, पुरस्कारासाठी वापरलेले निकष, पात्र पत्रकारांची माहिती कशी मागविण्यात आली आणि अंतिम नावे कोणत्या आधारावर निश्चित झाली, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने पुरस्काराच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पूर्वी या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या संपादकांशी चर्चा करून पत्रकारांच्या जनहिताच्या कामाचा, धाडसी वृत्तांकनाचा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार केला जात होता. यंदा अशी प्रक्रिया झाली का, याबाबतच संभ्रम असून, जलजीवन मिशन, पाणीटंचाई, रस्ते, गुन्हेगारी, अमली पदार्थ, शिक्षण आणि प्रशासनातील अनियमितता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने काम करणाऱ्या पत्रकारांचा विचार झाला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या वादात आणखी भर म्हणजे, अनेक वर्षांपासून अस्तित्वात नसलेल्या श्रीरामपूर प्रेस क्लबचा संयोजन समितीत समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील दोन पत्रकार संघटनांना समितीत स्थान देण्याची वेळ पालिकेवर आल्याने या प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त होत आहे.

नगराध्यक्ष करण ससाणे यांनी निवड प्रक्रियेबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, निवड समिती, निकष आणि संपूर्ण प्रक्रिया जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा **”ज्याचा वशिला त्याचं कुत्रं काशीला”** ही म्हणच या पुरस्काराला लागू पडल्याची भावना अधिक बळावेल, अशी प्रतिक्रिया पत्रकारांमधून व्यक्त होत आहे.

पत्रकार पुरस्कार हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नसून सत्यासाठी लढणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान असतो. त्यामुळे कोणताही संशय राहणार नाही, अशी पारदर्शक निवड प्रक्रिया राबविणे हीच वसंतराव देशमुख यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल. अन्यथा प्रतिष्ठेचा हा पुरस्कार केवळ औपचारिक सोहळा ठरेल आणि त्यामागील मूल्यांनाच तडा जाईल, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!