अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) धडक कारवाईत संगमनेर शहरात बंदी असलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईत ‘गोरी ब्युटी क्रीम’ आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ या उत्पादनांचा सुमारे १२ हजार ९०० रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला असून, या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्न, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीवर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी संगमनेर शहरातील गोल्डन मार्केट परिसरातील एका दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला.
तपासणीदरम्यान पाकिस्तानात उत्पादित करण्यात येणारी आणि भारतात विक्रीस बंदी असलेली ‘गोरी ब्युटी क्रीम’ तसेच ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पथकाने तत्काळ कारवाई करत हा साठा जप्त केला.
या सौंदर्यप्रसाधनांचा पुरवठा कुठून झाला, आणखी कोणत्या ठिकाणी अशा उत्पादनांची विक्री सुरू आहे, याचा शोध अन्न व औषध प्रशासन घेत आहे. संबंधित विक्रेत्याविरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईमुळे बेकायदा अन्नपदार्थ, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. नागरिकांनी अनधिकृत किंवा संशयास्पद सौंदर्यप्रसाधने खरेदी करू नयेत, तसेच अधिकृत विक्रेत्यांकडूनच उत्पादने घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.




Total Users : 600416