लोणी(जनता आवाज वृत्तसेवा) :- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील आशीर्वादनगर परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत अवघ्या काही मिनिटांत सलग तीन दुकाने फोडून रोख रकमेवर हात साफ केला. एकाच रात्री तीन व्यावसायिक आस्थापनांना लक्ष्य केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने इंडियन पोल्ट्री फॉर्म, भारत ॲग्रो आणि साई माऊली किराणा या दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील रोख रक्कम लंपास करून चोरटे पसार झाले.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे चोरट्यांची संपूर्ण हालचाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून तपासासाठी पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा लागला आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून संशयितांचा शोध सुरू आहे.
चोरीला गेलेल्या रोख रकमेचा तसेच इतर ऐवजाचा नेमका तपशील तपासानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अलीकडील काळात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. रात्रीची पोलीस गस्त अधिक प्रभावी करावी आणि चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. सलग तीन दुकाने फोडण्याच्या या घटनेमुळे लोणी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




Total Users : 603935