spot_img
spot_img

भक्तीमध्ये अनन्यता असावी; त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन भगवंतावर प्रेम करा – महंत रामगिरीजी महाराज  गोहत्या करणाऱ्यांवर कडक शासन झाले पाहिजे- मंत्री राधाकृष्ण विखे पा. धनगरवाडी पंचक्रोशीतील सप्ताहात भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ 

प्रतिनिधी -किरण शिंदे 

वाकडी(जनता आवाज वृत्तसेवा) :-भगवंताला सर्वस्व मानून त्याचे परायण होणारी भक्ती असावी.भक्तीमध्ये गुण-दोषाचा विचार नसावा. प्रेम हे अनिर्वचनीय असते आणि त्याचा अनुभव रम्य असतो.भक्तीमध्ये अनन्यता असावी, असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.

राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे सुरू असलेल्या सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात महंत रामगिरीजी महाराज यांनी भक्तीचे स्वरूप, त्रिगुण, सेवा आणि व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केले.

नारद भक्तिसूत्राचा संदर्भ देताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले, राजस, तामस आणि सात्त्विक अशा भक्तीच्या प्रवृत्ती आहेत. मात्र, या गुणांचे अतिक्रमण करून भगवंतावर प्रेम करावे आणि त्याच्या स्वरूपाला प्राप्त व्हावे. संपूर्ण जग गुणांवर चालते. ही सृष्टी त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे भक्तीच्या माध्यमातून या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.धनगरवाडी हे गाव एक निमित्त आहे. हा सप्ताह कुठल्याही एका गावातून होणारा नाही. आर्थिक नियोजन आपण करू शकतो; परंतु या कामासाठी मनुष्यबळ आणि वेळ लागतो. स्वयंस्फूर्तीने जी सेवा आपण देतो, ती महत्त्वाची आहे. धनगरवाडी पंचक्रोशीतील गावे स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत. भक्तगण आणि वारकऱ्यांसाठी सुविधा इतक्या सुंदर आणि तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महंत रामगिरीजी महाराज यांनी जीवहिंसेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. मानवाने व्यसनाचा त्याग करावा. व्यसनामुळे जीवन बरबाद होते आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. दारू, गांजा यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश संतांनी दिला आहे.संत कबीर महाराजांच्या संदर्भातून व्यसनाच्या दुष्परिणामांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, व्यसनामुळे माणसाचा विवेक हरपतो, पैसा वाया जातो आणि जीवन उद्ध्वस्त होते. त्यामुळे प्रत्येकाने व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, द्विशतकाकडे वाटचाल करणारा हा एकमेव सप्ताह आहे.केवळ गर्दी जमते म्हणून आपण येथे आलो नाही, तर या ठिकाणी असलेले अधिष्ठान आणि अध्यात्माची परंपरा अधोरेखित करणाऱ्या या परंपरेला वंदन करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत.अमली पदार्थविरोधी चळवळ ही केवळ शासनाने किंवा पोलिसांनी राबविण्याची बाब नाही.संपूर्ण सामाजिक व्यवस्थेतील प्रत्येकाची त्यामध्ये जबाबदारी आहे.

आपला देश आणि गाव १०० टक्के व्यसनमुक्त झाले पाहिजे, यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे विखे पाटील यांनी सांगितले गोवंश हत्या बंदी कायदा असूनही काही प्रकार घडत असल्याचे नमूद करत ते म्हणाले की,गोमाता ही राष्ट्रमाता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. गोमातेचे रक्षण करणे म्हणजे राष्ट्राचे संरक्षण करणे होय.ज्याप्रमाणे नशामुक्त भारत आणि अमली पदार्थमुक्त भारतासाठी काम करायचे आहे, त्याचप्रमाणे गोहत्या थांबविण्यासाठीही समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. गोहत्या करणाऱ्यांवर कडक शासन झाले पाहिजे,असेही ना विखे पाटील यांनी सांगितले.

महंत रामगिरीजी महाराज यांच्या पुढाकाराचे आणि नेतृत्वाचे अभिनंदन करताना विखे पाटील म्हणाले की, त्यांच्या दूरदृष्टीतून आणि नेतृत्वातून लाखोंचा जनसमुदाय या सप्ताहासाठी एकत्र येत आहे. सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्यावरील अमाप श्रद्धेचे हे प्रतीक आहे, असे त्यांनी नमूद केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!