spot_img
spot_img

जनआक्रोश मोर्चातील फोटोशी छेडछाड; महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चातील एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या फोटोशी छेडछाड करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आता अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याची कलमे वाढविण्यात आली आहेत. या प्रकरणातील महिला आरोपीचा शोध श्रीरामपूर शहर पोलिसांकडून सुरू आहे.

श्रीरामपूर शहरात १५ जुलै २०२६ रोजी आकाश दुबैय्या यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातील एका प्रमुख व्यक्तीचा फोटो एडिट करून त्याखाली बदनामीकारक मजकूर व अश्लील शिवीगाळ लिहून तो इंस्टाग्रामवरील विविध बनावट खात्यांद्वारे व्हायरल करण्यात आला होता.

या प्रकरणी संबंधित व्यक्तीच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात १६ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता कलम ७८ (१), ७८ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील एका महिलेने फिर्यादी या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील असल्याची माहिती असूनही जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने फोटोशी छेडछाड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादीच्या पुरवणी जबाबानंतर या गुन्ह्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मधील कलम ३ (१) (w)(ii) आणि ३ (१) (r) यांची भर करण्यात आली आहे. संबंधित आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई

दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करून व्यक्तीची बदनामी करणाऱ्या तसेच जातीय भावना दुखावणाऱ्या पोस्टप्रकरणी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!